औरंगाबाद – विवाह समारंभ आटोपून आपल्या शेतातील घराकडे निघालेल्या शेतकऱ्याला रस्त्यात गाठून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कन्नड तालुक्यात घडली. कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी जगन्नाथ साळुबा मनगटे (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कोयत्याने वार करून हा खून केल्याने संपूर्ण कन्नड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जगन्नाथ मनगटे यांच्या भावकीतील कारभारी मनगटे यांच्या मुलीचा विवाह मंगळवारी रात्री होता. हा विवाह सोहळा गावात होता. या समारंभासाठी जगन्नाथ मनगटे यांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावली. विवाह सोहळा आटोपून ते रात्रीच्या सुमारास आपल्या जवळच असलेल्या शेतातील घरी जात होते. लोहगाव-बरकतपूर या मार्गाने ते जात होते. दरम्यान, अज्ञात मारेकर्याने त्यांच्यावर कोयता व अन्य हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढवला. तोंडावर, पायावर व डोक्यावर वार केले. दरम्यान, त्यांच्या पत्नी ध्रुपदाबाई मनगटे यांना रोडवर रक्ताने भीजलेली टोपी निदर्शनास आली. यामुळे त्यांनी परिसरात शोध घेतला. याचवेळी त्यांना जखमी अवस्थेत पती आढळून आले. वेळ न दवडता त्यांनी व मच्छिंद्र आणि योगेश मनगटे यांनी सिल्लोड येथे उपचारासाठी त्यांना दाखल केले. मात्र, त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
या खळबळजनक घटनेची माहिती कळताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. तपासाकामी त्यांनी चक्रे फिरवली आहे. दरम्यान, याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.