नवी दिल्ली । मंगळवार 1 फेब्रुवारी रोजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेच्या टेबलवर सादर करतील. समाजातील प्रत्येक घटकाच्या नजरा या अर्थसंकल्पातील घोषणांकडे लागल्या आहेत. सध्या देश कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. संसर्ग रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. ज्यामुळे रुळावर आलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा फटका बसला आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री काय घोषणा करणार, हे मंगळवारीच स्पष्ट होईल. मात्र असे असले तरी करदात्यांचे सर्वाधिक डोळे अर्थसंकल्पाकडे लागले आहेत.
अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक महत्त्वाचे टप्पे असतील, ज्याद्वारे समाजातील विविध स्तरातील लोकं या अर्थसंकल्पात आपल्याला काय फायदा मिळेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र, अर्थसंकल्पातील क्लिष्ट भाषेमुळे या घोषणा सर्वांना समजणे सोपे नाही. येथे आम्ही करदात्यांशी संबंधित घोषणांविषयी माहिती देत आहोत, सामान्य करदात्याला अर्थमंत्र्यांच्या टॅक्स संबंधित घोषणा कशा समजू शकतील. सर्व प्रथम, पर्सनल टॅक्स बद्दल जाणून घेउयात.
इन्कम टॅक्सशी संबंधित घोषणा या सर्वात जवळून पाहिल्या जातात. विशेषत: कामगार वर्गाला हे जाणून घ्यायचे असते की, त्यांच्या हितासाठी सरकारने कोणत्या तरतुदी केल्या आहेत. आयकर कायद्याच्या कोणत्या कलमात किती सूट मिळते हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आयकर कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत विविध सूट उपलब्ध आहेत.
इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स वर सूट
उदाहरणार्थ, सामाजिक सुरक्षा आणि गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट देण्यात आली आहे. यामध्ये EPF, PPF मधील गुंतवणूक, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, सुकन्या समृद्धी योजना, टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आणि टॅक्स सेव्हिंग FD या पर्यायांचा समावेश आहे.
सध्याच्या नियमांमध्ये, एकूण 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स सूट उपलब्ध आहे. दोन मुलांसाठीची ट्यूशन फी, होम लोनची मुद्दल रक्कम, घर खरेदीसाठीची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्ज हे देखील कलम 80C चा भाग आहेत आणि याद्वारे इन्कम टॅक्स सवलतीचा क्लेम करता येईल. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधील गुंतवणुकीला कलम 80CCD(2D) अंतर्गत बेसिक सॅलरीच्या 10 टक्क्यांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळते.
होम लोनच्या व्याजात सवलत
इन्कम टॅक्सच्या कलम 24B अंतर्गत होम लोनच्या व्याजावर सूट देण्यात आली आहे. होम लोनच्या मासिक हप्त्यावर एकूण 2 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. होम लोनच्या हप्त्याव्यतिरिक्त, आपल्याला घराच्या दुरुस्तीसाठी 30,000 रुपयांपर्यंतच्या कर्जावरही टॅक्स सूट मिळते.
हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम सवलत
इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80D अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर टॅक्स सूट मिळू शकते. यामध्ये पॉलिसीधारकाच्या प्रीमियमवर टॅक्स सूट मिळते. या विभागात रु.25,000 पर्यंतच्या प्रीमियमवर सूट मिळू शकते. पालकांसाठी हेल्थ इन्शुरन्स देखील रु. 25-30000 च्या प्रीमियमवर मिळू शकतो. पालकांच्या आणि स्वतःच्या हेल्थ इन्शुरन्सवर 55,000 रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर टॅक्स सूट मिळू शकते.
शैक्षणिक कर्जावर सवलत
कलम 80E अंतर्गत, स्वत:च्या, जोडीदारासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजात सूट दिली जाते. कर्ज पूर्णवेळ उच्च शिक्षणासाठी घेतले पाहिजे, अशी सूट मिळण्याची अट आहे.
डोनेशनवर सवलत
कलम 80G अंतर्गत देणगीच्या रकमेवरही सूट देण्यात आली आहे. सरकारने अधिसूचित निधीमध्ये डोनेशन दिल्यावर, संपूर्ण रकमेवर टॅक्स सूट उपलब्ध आहे.