नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर केला. इन्कम टॅक्स सवलतीबाबत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची वाट पाहणाऱ्या देशातील करोडो करदात्यांची निराशा झाली. यंदाच्या अर्थसंकल्पातही इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इन्कम टॅक्सची स्थिती आहे तशीच राहिली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याची घोषणा नक्कीच केली आहे. कोविड-19 मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 10,00000 रुपयांपर्यंतच्या भरपाईवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. फक्त यापेक्षा जास्तीची भरपाई टॅक्सच्या कक्षेत येईल.
वास्तविक, सध्या भारतासह संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्यात आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसला आहे. सर्व सरकारांप्रमाणे भारत सरकारनेही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक नवीन व्यवस्था केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 मध्ये कोरोना बाधित आणि कोविड-19 संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांना विशेष दिलासा देण्याची घोषणा केली आहे. या नवीन तरतुदींनुसार जर एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना विविध स्रोतांकडून मिळणाऱ्या भरपाईबाबत विशेष घोषणा करण्यात आली आहे. नवीन तरतुदीनुसार, 10 लाख रुपयांपर्यंतची भरपाई टॅक्सच्या कक्षेबाहेर ठेवण्यास सांगितले आहे. भरपाई म्हणून यापेक्षा जास्त रक्कम असेल तरच टॅक्स भरावा लागेल. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नियोक्ता कंपनी, क्राउडफंडिंग किंवा अन्य स्रोतांकडून भरपाई दिली जाते.
उपचारावरील खर्चाबाबतही महत्त्वाची घोषणा यावेळी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नवीन अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार, कोविड-19 च्या उपचारांवर खर्च केलेली रक्कमही टॅक्सच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात करदात्यांना कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. यामुळे करदात्यांची निराशा झाली आहे. कोरोनाच्या काळात करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र यावेळी अर्थसंकल्पात त्यांच्या आशा पूर्ण झाल्या नाहीत.