Budget 2024 : येत्या 1 फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने केंद्र सरकार जनतेला खुश करण्यासाठी कोणकोणते निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. यंदाच्या या अंतरिम बजेट मध्ये रेल्वे विभागासाठी (Indian Railways) मोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे. 2024-25 मध्ये रेल्वेसाठी ३ लाख कोटींपेक्षा जास्त निधी मिळण्याची अपेक्षा आहे. जी मागील अर्थसंकल्पापेक्षा 25% नी जास्त असेल.
बजेटमध्ये रेल्वे विभागाला काय मिळणार- Budget 2024
यापूर्वी 2022-23 च्या अर्थसंकल्पात रेल्वे विभागासाठी ₹1.40 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2023-24 च्या अर्थसंकल्पात हाच आकडा 2.40 लाख कोटींवर गेला होता. आता यामध्येही आणखी वाढ होऊन यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2024) रेल्वे विभागासाठी तसेच नवनवीन सुविधा अमलात आणण्यासाठी केंद्र सरकार ३ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेची घोषणा करू शकते. देशातील रेल्वेगाड्यांचा वेग वाढवणे, रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करणे, सुधारित सुरक्षा वैशिष्ट्ये आणि फ्रेट कॉरिडॉरच्या विकासासह भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करणे यासाठी सरकार मोठ्या आर्थिक रकमेची तरतूद करण्याची शक्यता आहे. मागील वर्षात ओडिशातील ट्रेन अपघातानंतर रेल्वे विभाग गाड्यांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष्य केंद्रित करत आहे. त्याचाच भाग म्हणजे रेल्वे टक्करविरोधी प्रणाली किंवा कवच प्रणाली सुरु करण्याचे काम चालले आहे.
काय आहेत रेल्वे विभागाच्या योजना –
येत्या वर्षात देशात आणखी ३०० ते ४०० वंदे भारत ट्रेन चालवण्याचा सरकारचा मानस आहे. सध्यस्थितीत देशभरात 41 वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून धावत आहेत, मात्र यात मोठ्या सरकारने वाढ करण्याचे रेल्वे विभागाचे प्रयत्न आहेत. तसेच अमृत भारत योजनेअंतर्गत सर्व रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करणं, रेल्वे स्टेशनची संख्या वाढवणं हे रेल्वे विभागाचे मुख्य लक्ष्य असेल. यासाठी मोठी रक्कम वितरित केली जाईल. याशिवाय प्रस्तावित भारत- मध्य -पूर्व -युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) साठी भांडवली खर्चावरही तज्ञ लक्ष ठेऊन आहेत. हा प्रकल्प भारत, मध्य पूर्व आणि युरोपला रेल्वे, रस्ते आणि सागरी मार्गांच्या व्यापक वाहतूक नेटवर्कद्वारे जोडेल. त्यामुळे हा एकूण सर्व सारासार विचार करता १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget 2024) रेल्वे विभागासाठी अच्छे दिन येणार आहेत हे नक्की……