नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
मनमाड-नांदगाव महामार्गावरील बुरकुलवाडी परिसरातील एका फ्लोवर मिलला आज दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत मिल पूर्णपणे जळून खाक झाली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
नांदगाव महामार्गावर बुरकुलवाडी परिसरात औद्योगिक वसाहत असून त्यात अजित बेदमुथा यांची फ्लोवर मिल आहे. आज दुपारी त्यातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांनी दिसले. त्यानंतर त्यांनी बेदमुथा यांना त्याची माहिती दिली. मिलला आग लागल्याचे कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पालिकेचा अग्निशामक दलाचा १ बंब घटनास्थळी पोहोचला. मात्र, रविवारचा आठवडा बाजार असल्याने मनमाड मधील मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी होती. त्यामुळे हा बंब पोहचेपर्यंत आगीने रुद्ररूप धारण केले होते.
मनमाड नगरपरिषदेकडे ३ अग्निशामक बंब आहे. मात्र, यातील १ बंब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेसाठी तैनात करण्यात आला होता. तर दुसरा बंब उद्या होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडे केवळ एकच बंब असल्याने आग आटोक्यात आणण्यास वेळ लागला. मिलमध्ये धान्य बारदानाच्या गोण्या असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीला आग लागली, अशी माहिती उपस्थितांनी दिली आहे.