हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधी केस गेले, मग नंतर बोटाची नखे गळून पडली.. आता मात्र बुलढाण्याची जनता एका वेगळ्याच आजाराने त्रस्त आहे. बुलढाण्यातून आता एक भलतंच प्रकरण समोर आलं आहे. बुलढाण्यातील काही गावकऱ्यांच्या हातांची त्वचा फुटली आहे. त्वचेला भेगा इतक्या खोलवर गेल्या आहेत कि त्या खूपच वेदनादायक आहेत. महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातच अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. या नव्या आजाराचे गूढ नेमकं आहे तरी काय? हे अजून समजू शकलं नसलं तरी यामुळे आरोग्य विभागात मात्र खळबळ उडाली आहे.
यापूर्वी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव, खामगाव आणि नांदुरा भागात केस गळणे आणि नखे गळणे या घटना आधीच नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातून नागरिक आता कुठं सावरत आहे तोच आता हातांच्या बोटांना भेगा पडण्याच्या नव्या आजाराने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. सध्या मेहकर तालुक्यातील शेळगाव देशमुख नावाच्या गावात २० रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसली आहेत. हे गाव सुमारे ४ ते ५ हजार लोकसंख्या असलेल गाव आहे, त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
सुरुवातीला लोकांना अशी भीती होती की हा आजार संसर्गजन्य रोग असू शकतो, परंतु आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत तज्ज्ञांची एक टीम गावात पाठवली. १५ जून रोजी डॉ. प्रशांत तांगडे जिल्हा संसर्गजन्य रोग सर्वेक्षण अधिकारी, बालाजी आद्रत त्वचारोगतज्ज्ञ, डॉ. माधुरी मिश्रा वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांच्या पथकाने गावाचे सर्वेक्षण केले आणि २० रुग्णांची सखोल तपासणी केली. तपासणीनुसार, २० पैकी १४ रुग्ण पाल्मो-प्लांटर एक्जिमा, पाल्मो-प्लांटर डर्मा आणि पाल्मो-प्लांटर सोरायसिस सारख्या त्वचेच्या आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले. या आजारांमध्ये, विशेषतः तळवे आणि हात आणि पायांच्या तळव्यांची त्वचा कोरडी पडते आणि त्यात भेगा आणि खोल भेगा दिसू लागतात. हा रोज संसर्गजन्य रोग नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केलं. तेव्हा कुठे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र तरीही काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागाने दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला-
हाता-पायांना केमिकलच्या संपर्कात आणू नका
साबण, डिटर्जंट, खत आणि कीटकनाशके वापरताना हातमोजे वापरा
कोरड्या त्वचेवर नियमितपणे मलम किंवा मॉइश्चरायझर लावा
जास्त खाज किंवा भेगा पडत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा




