लोणंद | कोरोना नियमांचे, तसेच बैलगाडी शर्यत बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे. लोणंद ते पिंपरे रस्त्यावर शेळके पाटील वस्तीच्या पुढे वीटभट्टीच्या मागील बाजूकडील शेतात बेकायदा व अनधिकृत बैलगाडी शर्यत मैदान तयार करण्यात आले आहे. त्याठिकाणी दोन बैलांना छकड्यास जुंपून त्याचा सराव केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लोणंदच्या हद्दीत लोणंद – पिंपरे रस्त्यावर शेळके पाटील वस्तीच्या पुढील बाजूच्या वीटभट्टीच्या पाठीमागील शेतात बेकायदा व अनधिकृत बैलगाडी शर्यत मैदान तयार करून दोन बैलांना छकड्यास जुंपून त्याचाच सराव करत असताना हनुमंत ऊर्फ पिनू शिवाजी मदने, बाळू एकनाथ मदने (दोघेही रा. खडकी, ता. फलटण), सागर नंदू जगताप व वैभव धायगुडे (दोघेही रा. शेळके वस्ती, लोणंद) हे आढळून आले.
त्यांनी जिल्हाधिकारी यांनी कोरोना अनुषंगाने घालून दिलेल्या अटी शर्तीच्या आदेशाचा भंग करून सुरक्षिततेच्या अनुषंगाने तोंडास मास्क न लावता व एकत्र जमून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होईल हे माहीत असूनही मानवी जीवन धोक्यात येईल, असे कृत्य करून प्राण्यांना निर्दयीपणे व क्रूरतेची वागणूक देऊन बैलगाडी शर्यत बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अविनाश नलवडे अधिक तपास करत आहेत.