नवी दिल्ली । महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले आहे.
बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे यावेळी मंत्री गिरीराज सिंह यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात त्यासाठी केंद्रीय सरकारकडे सातत्यातने पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राची सुमारे ४०० वर्षांची परंपरा, बैलगाडा शौकिन व मालक यांच्या भावना, देशी गोवंशाचे रक्षण व ग्रामीण पर्यटनाला चालना या हेतूने ‘बैल’ या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळावा, यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होतील, अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना यावेळी करण्यात आली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.