नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षांच्या तरुणीला बसने चिरडले आहे. वैशाली शिवाजी गायकवाड असे या तरुणीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत वैशाली ही शहर पोलीस आयुक्तालयातील अंमलदार शिवाजी गायकवाड यांची मुलगी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
कशा प्रकारे घडली घटना ?
वैशाली शिवाजी गायकवाड ही तरुणी शुक्रवारी नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली होती. ती मुख्य बसस्थानक परिसरात आली असता त्यावेळी नंदुरबारकडे निघालेल्या (एम.एच.15 बी.एल. 3445) या बसने वैशालीला चिरडले. जेव्हा हि बस मुख्य स्थानकातून बाहेर पडली त्यावेळी वैशाली हि रस्ता ओलांडत होती. यावेळी बसने वैशालीला जोरदार धडक दिली आणि ती जागेवरच कोसळली. तिला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर तिला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.
चालक घटनास्थळावरून फरार
या अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृत वैशालीचे वडील पोलीस आयुक्तालयात अंमलदार आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सरकार वाडा पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत वैशाली हि अत्यंत हुशार होती. तिने अनेक मोठमोठी स्वप्ने पहिली होती. तिला आपल्या वडिलांचा आधार व्हायचे होते. त्यासाठी ती नोकरी शोधत होती. मात्र काळाने तिच्यावर घाला घातल्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.