हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई- पुणे एक्सप्रेसवे (Mumbai Pune Expressway) वरील अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे. आजही या एक्सप्रेसवे वर भीषण अपघात घडला आहे. लग्नाचं वर्हाड घेऊन निघालेल्या बसला खोपोलीजवळ आग लागली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग (Bus Fire) लागली. यावेळी या बस मध्ये तब्बल ४२ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी कि, ही बस सोलापूरहून मुंबईला वऱ्हाड घेऊन चालली होती. रात्री २ वाजता हि बस रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ आली आणि त्याचा दरम्यान बसला भीषण अशी आग लागली. बस पेटल्यानंतर प्रवाशी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करत होते. त्यानंतर महामार्ग पोलीस, अग्निशमन दल, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या संस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.
दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याबाबत स्पष्ट माहिती समोर आली नाही, मात्र शॉर्टसर्किटमुळे हि आग लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. दररोज हजारो प्रवासी या महामार्गावरून प्रवास करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ही मोठी चिंतेची बाब आहे.