लोकांना घरात बंद करून, काही साध्य होणार नाही हो उपाययोजना कराव्या लागतील : चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपने लॉकडाऊन करण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे. लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा कोरोनावर प्रभावी आणि दीर्घकालिन उपाययोजना कराव्यात, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढविणे आणि प्रभावी उपाययोजानांवर अधिकाधिक भर द्या, असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वचजण चिंतेत आहेत. केवळ आठ दिवस किंवा पंधरा दिवसाच्या लॉकडाऊनमुळे तो संपणार नाही . लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण कमी होईल. पण तो समूळ नष्ट होणार नाही. त्यामुळे तात्पुरता लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करण्यासह प्रदीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांसाठी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविल्या पाहिजेत.

कोरोना चाचण्यांसंदर्भात लोक साशंक आहेत. त्यामुळे बिनचूक टेस्टिंग किटसाठी पाठपुरावा केला पाहिजे. टाटाने अशा प्रकारचे टेस्टिंग किट उपलब्ध करुन दिले होते, मात्र ती कुठे गायब झाली, याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरु करणे, ज्यांना तीव्र स्वरुपाची लक्षणे आहेत, त्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवणे, तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सर्व रुग्णालयांना पुरवणे, त्याचप्रमाणे रुग्णालयांमध्येच ऑक्सिजन तयार होईल, अशी यंत्रणा कार्यन्वित करणे, याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्हेंटिलेटरचा आढावा घेणे, तसेच मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविडच्या कामात सहभागी करुन घेणे, आदी उपाययोजना करण्याची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनामुळे लॉकडाऊनवर भर देण्याऐवजी अर्ली डिटेक्शन, बिनचूक टेस्टिंग किट उपलब्ध करुन देणे, अद्यायवत सुविधांनी युक्त कोविड रुग्णालये, रेमडेसिवीरची उपलब्धता आदींसाठी आमदारांना वाढीव दोन कोटी रुपये विकासनिधी दिला आहे, तो सर्व जिल्हानियोजनमध्ये जमा करावा. कारण, एका जिल्ह्यात साधारणत: दहा अमदार प्रमाणे २० कोटी रुपये निधी उपलब्ध असतो, त्यासोबतच शासनाने अतिरिक्त २० कोटी प्रत्येक जिल्ह्यांना असे एकूण ४० कोटी रुपये मिळाल्यास त्याद्वारे प्रभावी उपाययोजनासह पायाभूत सुविधा वाढविणे शक्य आहे. त्यामुळे लोकांना घरात बंद करुन, काही साध्य होणार नाही. त्याऐवजी प्रदीर्घ कालीन विचार करुन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.