पोटनिवडणूक निकाल : धुळ्यात भाजपाची जिल्हा परिषदेत गाडी सुसाट

धुळे | धुळे येथील जिल्हा परिषद गटावर पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिरपूर पंचायतीच्या 6 गणांच्या सर्वच्या सर्व जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे शिरपूरमध्ये अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व अधोरेखित झालं आहे.

धुळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत धुळ्यात एकूण 65 टक्के मतदान झाले. त्यात शिरपूर तालुक्यात 57.12 टक्के मतदान झाले होते. धुळ्यात प्रचंड मतदान झाले असले तरी शिरपूर येथील निकालांवर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं होतं. पंचायत समितीच्या सहा गणांवर भाजप वर्चस्व कायम राखणार की महाविकास आघाडीच्या प्रयोगासमोर भाजप निष्प्रभ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अमरिशभाई पटेल यांच्या अचूक नियोजनामुळे भाजपने सहापैकी सहा जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखली आहे.

 

You might also like