मुंबई प्रतिनिधी । तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री प[पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले.
त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सह पक्षांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या स्वरूपाविषयी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी एक-दोन दिवसांत चर्चा सुरू होण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदी एवढ्यातच नियुक्ती करायची नसल्याचे समजते. यामध्ये मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त शिवसेनेच्या वाट्याला १५ मंत्रिपदे येणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला १४ आणि काँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळू शकतात असे सूत्रांचे म्हणणे आहे.