औरंगाबाद : शहरात विमानतळ समोरील उड्डाणपूल आता होणार नाही. तसेच जालना रोडवरील तीनही पूल एकमेकांना जोडून अखंड पूल तयार करण्यात येईल, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य झाला असल्याचे देखील जलील यावेळी म्हणाले.
दरम्यान, शहरात जालना रोडवर सध्या ३ छोटे उड्डाणपूल आहेत. त्यांना अखंड केल्यास नागरिकांना लागणारा प्रवासाचा वेळ कमी लागेल. तसेच विमानाने महाराष्ट्राबाहेरून येणारे व्यावसायिक अवघ्या १० ते १२ मिनटात विमानतळावरून शेंद्रा एमआयडीसी मध्ये पोहचतील. तसेच हा नवीन उड्डाणपूल क्रांती चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत असणार आहे. दुधडेअरी सिग्नल, सेवन हिल, सिडको, तसेच मुकुंदवाडी असा तो उड्डाणपूल असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी मराठवाड्यात आता दोन केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे तरी आपला विकास वेगाने व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर संसदेत चर्चेचा मुद्दा ठरलेल्या पेगसेस प्रकरणावर देखील त्यांनी परखड भाष्य केले. तसेच राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता. असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 15 ऑगस्ट रोजी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार अशी माहिती इमतियाज जलील यांनी दिली.