कराड | शिक्षण क्षेत्रात भांडलवदारी, व्यावसायिकता आलेली आहे. स्वतंत्र भारतात पैशाचे वर्चस्व संपवून ज्ञानाचे वर्चस्व आणल्या शिवाय पर्याय नाही. शैक्षणिक क्रांती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, ती न होता ती व्यावसायिक स्वरूपाची झाली आहे. शिक्षण क्षेत्राला भांडवलदारी सारखा रोग लागलेला आहे. मुलीच्या प्रगतीचे काैतुक तेव्हाच होईल, जेव्हा प्रत्येक घरातील मुलींच्या शिक्षणावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी व्यक्त केले.
तांबवे (ता. कराड) येथील डाॅ. शलाका तात्यासाहेब पाटील हिने विद्यावाचस्पती (पीएचडी) ही पदवी संपादन केली आहे. डॉ. शलाका हिचा तांबवे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. इंद्रजीत यशवंतराव मोहिते बोलत होते. यावेळी सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संचालक ॲड. प्रकाश राजाराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांचे संचालक रामभाऊ पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, तात्यासाहेब पाटील व शारदा पाटील, शीतल पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ॲड. प्रकाश पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. अशावेळी तांबवे सारख्या ग्रामीण भागातील आई- वडिलांच्या कष्टाचे चीज करत डाॅ. शलाका यांनी अभिमानास्पद यश मिळवले आहे. प्रत्येक मुलीने आपल्या पालकांचे नाव उज्वल करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात नाव कमविणे गरजेचे आहे. प्रास्ताविक उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सतिश यादव यांनी केले. रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.