कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी भागातील दिवशी घाटाच्या परिसरात दिवसाढवळ्या कार अडवून महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याच्या गुन्ह्याचा ढेबेवाडी पोलिसांनी २४ तासात उलगडा केला. त्या महिलेला दवाखान्यातून घरी घेवून चाललेला कारचालकच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निघाल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुन्ह्यातील संशयित व त्याच्या अन्य एका साथीदाराकडून पोलिसांनी चोरीस गेलेले दागीने जप्त केले आहेत.
बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास दिवशी घाट परिसरातील शिद्रुकवाडी या गावाजवळ ही घटना घडली होती.तेथील हौसाबाई कोळेकर (वय- ७०) आजारी असल्याने गावातील अंकुश दिनकर पवार त्यांना स्वतःच्या कारमधून तळमावले येथील दवाखान्यात घेवून गेला होता. हौसाबाई यांच्या सोबत त्यांची मुलगीही होती. दुपारी दवाखान्यातून ते सर्वजण घरी निघाले असताना दिवशी घाट परिसरात शिद्रुकवाडी पासून दोन किलोमीटरवर अज्ञातव्यक्तीने त्यांची मोटार अडवून चाकूच्या धाकाने हौसाबाई यांच्या गळ्यातील सोनसाखळी व बोरमाळ हिसकावून डोंगरात धूम ठोकली. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी त्या परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली. पोलीस उपअधिक्षक अशोकराव थोरात व सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांना कार चालक अंकुश पवार याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी तपासात त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले. गुन्हा घडल्यानंतर २४ तासात गुन्ह्याचा उलगडा करत चोरीला गेलेले सुमारे एक लाख २० हजार रुपयांचे दागीने जप्त केले. घाटातील एका कठड्याजवळ हे दागिने लपवून ठेवलेले होते. अंकुशने एका सहकाऱ्याच्या मदतीने हा चोरीचा प्रकार घडवून आणल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे पोलीस आधिकारी अशोकराव थोरात व संतोष पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेनुसार व पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पवार,श्री.खराडे,प्रशांत चव्हाण,चंद्रकांत पाटील,कपिल आगलावे यांनी तांत्रिक बाबी तपासून हा तपास यशस्वी केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा