पालघर प्रतिनिधी । माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरार पूर्व चंदनसार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
बविआचे क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात शिवसेनेने प्रदीप शर्मा हे नालासोपारा विधानसभेत निवडणूक लढवत होते. शर्मा यांनी ठाकूर यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली होती. निवडणूक प्रचारादरम्यान शर्मा आणि ठाकूर गटात अनेकदा वाद झाले. मात्र आता मतदान अधिकाऱ्यांशीही वाद केल्याने शर्मावर अरेरावीचा आरोप होत आहे.
सोमवारी विरार पूर्वेच्या चंदनसार येथील क्रमांक ६७ या मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास शर्मा हे अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांसह आले होते. त्यावेळी मतदान केंद्र क्रमांक ११ येथे प्रदीप शर्मा आणि निवडणूक अधिकारी बाळकृष्ण मालोदे यांच्यात शाब्दिक वाद झाला. यात प्रदीप शर्मा यांनी मालोदे यांना धमकी दिली. यामुळे मतदान केंद्रात जबरदस्ती प्रवेश करणे, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणे, असे गंभीर आरोप शर्मा यांच्यावर आहेत. या प्रकरणात त्यांच्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी दिली.