कराडच्या संभवनाथ पतसंस्थेकडून 2.50 कोटींची फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरातील संभवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतील अडीच कोटीच्या व्यवहारासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंधरा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आयकर विभागाने गोठवून ठेवलेल्या रक्कमेचे संस्थेने कर्ज स्वरुपात वाटप केल्याचे उघडकीस आले आहे.

आयकर विभागाचे पुणे येथील अधिकारी संजीवकुमार गोपाल शर्मा यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सुरेश जेठालाल देढीया, सहअध्यक्ष सुभाष बडीलाल शहा, संचालक रोहन मधुकर भाटे, दिलीप धनजी शहा-निलकमल, भूपेंद्रकुमार मूळजी शहा, किशोर धनाजी केनिया, अनिल केशवलाल दोशी, उषाबेन दिनेश शहा, कुसुमवेन किशोरभाई केनिया, राहुलकुमार लालचंद शहा, पंकज मणिलाल शहा, व्यवस्थापक अरविंद शेवाळे, कारकून अशोक शंकर चव्हाण, लक्ष्मण ज्ञानदेव शिर्के व संबंधित अनोळखी आदींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील दत्त चौकात संभवनाथ पतसंस्थेची शाखा आहे. या शाखेत २०१८ ते जानेवारी २०१९ पर्यंत आरोपींनी विविध लोकांच्या नावावर एफडीची रक्कम ठेवली. मात्र, त्याबाबत संबंधित लोकांना कसलीच माहिती नव्हती. तसेच आवश्यक केवायसी कागदपत्रही नव्हती. संस्थेत कसलीही एफडी नसल्याचे आणि असलेली एफडी कोणी ठेवली याची कसलीच कल्पना नसल्याचे चौकशीदरम्यान संबंधितांनी सांगितले.

दरम्यान, आयकर विभागाने संस्थेच्या २०१८ साली जमा असलेल्या २ कोटी ५३ लाख ९२ हजार ९७४ रुपयांच्या ठेवीची रक्कम गोठवून ठेवण्याचा आदेश दिला होता. हा आदेश देऊनही ती रक्कम पतसंस्थेने आठ लोकांना कर्ज स्वरूपात दिल्याने आयकर विभागाच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसात पतसंस्थेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.