हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke), त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आवारे यांच्या आई सुलोचना गंगाराम आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेळके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुलोचना आवारे यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटल की, , किशोर आवारे यांचे राजकीय विरोधक असलेले सुनिल शेळके, सुधाकर शेळके,संदीप गराडे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत होते. किशोर यांचे राजकीय वर्चस्व निर्माण होऊन सुनील, सुधाकर यांच्या राजकीय वर्चस्वला धोका निर्माण झाला होता. सुनिल शेळके त्याचा भाऊ सुधाकर शेळके यांच्याकडून जिवाला धोका असल्याचे किशोर आवारे ६ महिन्यांपासून सांगत होते. येव्हडच नव्हे तर जर माझ्या जीवाचं बरंवाईट झालं तर ते याच लोकांपासून होईल हे सुद्धा आवारे यांनी यापूर्वीच सांगितल्याचे फिर्यादीत म्हंटल आहे. या संपूर्ण प्रकरणात सुनील शेळके यांच्यावर थेट आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
काल भरदुपारी किशोर आवारे यांची निर्घृण हत्या
काल भर दुपारी ४ जणांनी किशोर आवारे यांची निर्घृण हत्या केली. किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन खाली आले असताना त्यावेळी त्या परिसरात दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आधी त्यांच्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले . आवारे हे रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आवारे यांच्या हत्येनंतर संपूर्ण पुणे हादरले.