हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्या प्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंविच्या कलम 500 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. तसेच संजय राऊत यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहावं लागेल.
नेमकं काय घडलं होत –
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे याना दिल्यांनतर ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता. त्यातच पुण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटल्याची टीका केली होती. यावर उत्तर देताना राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. आणि ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला सांगत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.