CBSE 12th Exam : 12 वी परीक्षांबाबत PM मोदी यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता बारावीच्या सीबीएसई परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी महत्वाची बैठक घेतली जाणार आहे.

या बैठकीत पंतप्रधानांना परीक्षेच्या सर्व पर्यायांची माहिती दिली जाईल, ज्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्ये आणि भागधारकांसह झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. या व्हर्च्युअल बैठकीत शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव उपस्थित होते.बैठकीत शिक्षणमंत्री निशंक यांनी राज्यांना 25 मे पर्यंत सूचना देण्याचे आवाहन केले होते.

केजरीवालांची परीक्षा रद्द करण्याची मागणी

दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे की बारावीच्या परीक्षेबाबत मुले आणि पालक खूपच चिंतित आहेत, लसीकरण शिवाय बारावी परीक्षा घेऊ नये अशी मागणी पालकांनी केली आहे. मी केंद्र सरकारला आवाहन करतो की बारावी परीक्षा रद्द करावी आणि त्यांच्या मागील कामगिरीच्या आधारे त्यांचे मूल्यांकन केले जावे, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.