सांगली | आलिशान चौक येथे दोघांना धारदार चाकूने केक कापून वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. बर्थडे बॉयच्या मित्रांनी चाकूने केक कापून त्या चाकुसह उभे राहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. सदरचा प्रकार सांगली शहर पोलिसांना कळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी बर्थडे बॉयसह पोलिसांच्या रेकॉर्डवर असणारा गुन्हेगारास जेरबंद केले.
रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहसीन उर्फ चपट्या बबल्या नूरमहंमद शेख आणि आस्लम दावलसाब मुल्ला असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आलिशान चौकात राहणाऱ्या आस्लम मुल्ला याचा गुरुवारी वाढदिवस होता. त्याच्या मित्रांनी वाढदिवस जंगी करण्याचे नियोजन केले होते. नियोजनाप्रमाणे बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रांनी सेलिब्रेशनसाठी केक आणला होता. मुल्ला याचा मित्र रेकॉर्ड्डवर असणारा गुन्हेगार मोहसीन शेख याने केक कापण्यासाठी खास धारदार चाकू आणला होता. मुल्ला याच्या वाढदिवसाचा केक त्याच चाकूने कापून साजरा केला. या प्रसंगाचे फोटो काढून दहशत माजवण्याचा हेतूने सोशल मोडियावर व्हायरल करण्यात आले.
फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने चक्रे फिरवून गुरुवारी पहाटेच्या सुमारास मोहसीन उर्फ चपट्या बबल्या नूरमहंमद शेख आणि आस्लम दावलसाब मुल्ला या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी केक कापण्यासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी यावेळी जप्त केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’