तरसांच्या हल्ल्यात अठ्ठावीस मेंढ्या ठार

सांगली | वाळवा तालुक्यातल्या बहादुरवाडीत तरसाच्या हल्ल्यात अठ्ठावीस मेंढ्या ठार झाल्या. तर दोन मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

बहादुरवाडीच्या दक्षिणेला वारणा नदी काठी सागर पाटील यांचा मळा आहे. सागर पाटील यांच्या शेतात सात दिवसापूर्वी खतासाठी मेंढ्या बसविल्या होत्या. यातील सुमारे चारशे ते पाचशे मेंढ्या गुरुवारी चरण्यासाठी बाहेर पाठविण्यात आल्या होत्या. तर तीस मेंढ्या पाटील यांच्या शेतातच लोखंडी जाळीच्या डालग्यात बसविण्यात आल्या होत्या. गुरुवारी दुपारी या ठिकाणी कोणीही नसताना अचानक चार ते पाच तरसांनी मेंढ्यावर हल्ला चढविला. यात अठ्ठावीस मेंढ्या जागीच ठार झाल्या. तर दोन मेंढ्या गंभीर जखमी झाल्या.

यावेळी मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सागर पाटील घटनास्थळी आले. त्यांनी तरसांना हाकलले. यामुळे इतर तीन डालग्यातील सुमारे बावीस मेंढ्या वाचल्या. या घटनेने बहादुरवाडी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like