टीम, HELLO महाराष्ट्र। संपूर्ण देशाच्या बहुतांश भागात यंदा पावसाने उशिरापर्यंत जोरदार हजेरी लावली. तसेच उशिरा झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याचा सर्वात मोठा परिणाम कांद्याच्या उत्पनावर झाला. घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. अनेक ठिकाणी कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे.
सोलापूरात आणि बंगळुरूमध्ये शुक्रवारी कांदा २०० रूपये प्रतिकिलोपर्यंत पोहचला होता. सध्या कांद्याचे भाव नियंत्रणात न आल्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिरिक्त १२ हजार ६६० मेट्रिक टन कांदा आयातीसाठी करार केला आहे. हा कांदा २७ डिसेंबर पासून भारतात येण्यास सुरूवात होणार आहे. याचबरोबर आता आयात केल्या जाणाऱ्या एकुण कांद्याचे प्रमाण हे जवळपास ३० हजार मेट्रिक टन पर्यंत पोहचले आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून गुरूवारी ही माहिती देण्यात आली.
याशिवाय केंद्रीय एजन्सी एमएमटीसी अतिरिक्त १५ हजार मेट्रिक टन कांद्यासाठी नवी निविदा काढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कांद्याच्या वाढत्या किंमतींपासून त्रस्त झालेल्या सर्वसानान्यांना आता लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कांदा आयातीमुळे त्यांचे दर देखील लवकरच कमी होण्यास मदत मिळणार आहे.