शिवजयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात ‘जय शिवाजी जय भारत’ निघणार पदयात्रा; केंद्र सरकारचा आदेश

0
4
Shivjayanti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने (Central Government) राज्याला पत्र पाठवून प्रत्येक जिल्ह्यात ‘जय शिवाजी, जय भारत’ (Jay Shivaji, Jay Bharat) पदयात्रा काढण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या पदयात्रेचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सकाळी 7.30 वाजता व्हर्च्युअल पद्धतीने करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानंतर सकाळी 8.30 वाजता प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रेला सुरुवात होईल.

ही पदयात्रा साधारण 6 किलोमीटर लांब असणार असणार आहे. त्यात मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तर पुण्यात या यात्रेत केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत. खास म्हणजे, शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचा जागर घडवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचे प्रेरणादायी दर्शन घडवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

शिवरायांच्या पुतळ्याचे 90 टक्के काम पूर्ण

महत्वाचे म्हणजे, सध्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती तलवार धारी पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये पुतळ्याच्या चबुतऱ्याचे 90% काम पूर्ण झाले आहे. आता उत्तर प्रदेशातील नोएडा येथून आणलेले खडकसदृश बेस मालवणच्या सागरी महामार्गावर उतरवण्यात आले आहेत. श्री राम सुतार आर्ट क्रिएशन या कंपनीने तयार केलेले 30 बाय 30 फूट लांबीचे हे तीनही भाग लवकरच शिवपुतळ्याच्या चौथऱ्यावर बसवले जाणार आहेत.

दरम्यान, पुण्यातील आंबेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसरा टप्पाही अत्यंत भव्य स्वरूपात साकारला आहे. यात रायगड आणि लोहगड किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.

तसेच, प्रतापगडावर असलेल्या शिवरायांच्या कुलदैवत तुळजाभवानी देवीचे हुबेहूब मंदिर येथे तयार करण्यात आले आहे. इतिहासप्रेमी आणि नव्या पिढीला शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास समजावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या शिवसृष्टीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचे कामही सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो शिवप्रेमींसाठी एक भव्य ऐतिहासिक केंद्र ठरणार आहे.

शिवजयंतीनिमित्त राज्यभर उत्साह

शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पदयात्रा, शिवपुतळा उभारणी आणि ऐतिहासिक ठिकाणांच्या जतनासाठी होणाऱ्या प्रकल्पांमुळे शिवप्रेमींमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे. यात आता काढण्यात येणाऱ्या पदयात्रेमुळे शिवजयंतीची शोभा आणखीन वाढणार आहे.