हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल मुंबई हाय कोर्टाने दिला आहे. 28 मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत
मुंबई हायकोर्टात राज्यात अकरावी प्रवेशाबाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्या संदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी आज झाली. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली
कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी सीईटी पूर्णपणे एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी अधिसूचना २८ मे रोजी काढण्यात आली होती. आज निकाल देताना हायकोर्टाने ही अधिसूचना रद्द केली आहे. तसेच सहा आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. कोरोना काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे हे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या आठवड्यापर्यंत १० लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली होती.