हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील पूल पाडण्याची तारीख अखेर समोर आली आहे. येत्या २ ऑक्टोबरला हा पूल पाडण्यात येईल . पूल पाडल्यानंतर कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चांदणी चौक येथील पूल पाडण्याविषयी चर्चा झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
चांदणी चौकातील हा पूल पाडण्याचे नियोजन, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, पूल पाडण्यासाठी लागणारा कालावधी, राडारोडा टाकण्याचे ठिकाण याबाबतचा सविस्तर अहवाल २७ सप्टेंबरला सादर करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच हा पूल पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरु होती. या पूलाच्या खालच्या भागात मोठे होल्स करुन त्यात स्फोटकं लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी लहान पहिला ब्लास्ट करण्यात आला होता. त्याचा अंदाज घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूल पाडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.