हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने संभाजीनगर व उस्मानाबाद शहराच्या नामांतराचे निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयावरून शिवसेना नेते व औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. “संभाजीनगर शहराच्या नामांतराचे श्रेय घेण्यासाठी शिंदे-भाजप सरकारने पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण टीकेनंतर त्यांना पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला. आता या सरकारने केंद्रातून एका महिन्यात निर्णयाला मंजुरी आणावी. तसेच नामांतराचं संपूर्ण श्रेय हे फक्त बाळासाहेबांचंच आहे, ते कुणालाही घेता येणार नाही,” असे खैरे यांनी म्हंटले.
शिवसेना नेते खैरे यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 1988 पासून आम्ही औरंगाबाद शहराच्या नामांतरासाठी आंदोलन करत आहोत. आता पुन्हा नव्याने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारने केंद्रातून लवकर मंजुरी मिळवून आणावी, त्याशिवाय आम्ही कोणताही आनंद साजरा करणार नाही. केद्रांची मान्यता मिळाल्यानंतरच आमचा जल्लोष असेल.
यावेळी खैरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “संभाजीनगरचे नामांतर आता केले आहे. या शहराचे नामांतर करायचेच होते, तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात हे नामांतर का केलं नाही?.
महिनाभरात नामकरण केले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करु : दानवे
यावेळी अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. ते म्हणाले की, आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. महाविकास आघाडीत शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्याचे कारण देत शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे केले. मग बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर केलेल्या नावाच्या निर्णयाला तुम्ही स्थगिती कशी देता? आता तर केंद्रातही भाजपचे सरकार आहे. जर महिनाभरात औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करुन आणले नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा दानवे यांनी फडणवीसांना दिला.