पुणे प्रतिनिधी | कोरोनाच्या संकटकाळात अनेक घरगुती सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. अनेकांनी बुक केलेल्या हॉलच्या तारखाही रद्द झाल्या आहेत. पारंपरिकतेचा वैश्विक अभिमान बाळगणाऱ्या पुणेकरांनी मात्र ठरलेल्या तारखेलाच विवाह करण्याचा ट्रेंड सेट केला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी योग्य अंतर राखून लग्न केलं आहे. रविवार दिनांक १० मे रोजी परशुराम सलगरे आणि रेखा सोनटक्के यांचा विवाह लॉकडाऊनमध्ये पर्वती येथील तक्षशीला बौद्ध विहारात योग्य अंतर राखून पार पडला.
पुण्यातल्या ‘डायस’ प्लॉट परिसरात राहणारे सलगरे आणि प्रेमनगर मार्केटयार्ड येथे राहणारे सोनटक्के कुटूंबिय आपल्या पाल्यांचा विवाह करण्याबाबत ठाम होते. याबाबत निर्णय घेऊन मोजक्या जणांत हा सोहळा संपन्न करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. परशुराम सलगरे या तरुणाचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. सलगरे आणि सोनटक्के कुटुंबियांच्या लग्न सोहळ्यास भाजपचे प्रदेशअध्यक्ष आणि कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मागील २ वर्षांमध्ये राज्याच्या सत्तानाट्यात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रकांतदादांना याही गोष्टींसाठी वेळ मिळाला हे पाहून त्यांना बाहेरचा म्हणून हिणवणाऱ्या पुणेकरांनी देखील काही क्षण त्यांना आपलं समजलं.
विधानपरिषद निवडणुकीच्या कुरघोडीयुक्त राजकारणातही चंद्रकांतदादांचा हात असेल अशी शक्यता एकनाथ खडसे यांनी आज बोलून दाखवली. त्यातही लग्नासारख्या शुभप्रसंगी उपस्थित राहून चंद्रकांतदादांनी आजही आपले पाय जमिनीवर आणि माणसांत असल्याचं सिद्ध केलं आहे. या लग्नासाठी प्रभाग क्रमांक २८ ( ब )चे नगरसेवक श्रीनाथ भिमाले, भाजप झोपडपट्टी आघाडीचे पदाधिकारी गणेश शेरला, सचिन खंडाळे, अमोल खंडाळे तसेच तक्षशीला बौद्ध विहाराचे गणेश चव्हाण, भन्ते सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.