हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशीप्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या या इशाऱ्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत. अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले, असा इशारा देत चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना खुशाल गुन्हा दाखल करा, असे आव्हान दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. त्यामुळेच सर्व काही केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी असं राजकारण करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी रोज खोटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या केसेस दाखल करताय. खुशाल गुन्हा दाखल करा. आम्ही घाबरत नाही. अनिल देशमुखही धमक्या देत देतच गेले, असं पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटील हे सौम्य वाटले होते. पण इंजेक्शन दिल्यावर तेही पुढे जात असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
लसीकरणाचा काळाबाजार होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर लसी वाया गेल्या आहेत. या लसींची श्वेतपत्रिका काढा, असं माझं जाहीर आव्हान आहे. लोक प्रचंड नाराज आहेत. लसीसाठी वणवण भटकत आहेत. उद्या जर लोक मंत्र्यांच्या, आमदारांच्या घरात घुसले तर नवल वाटायला नको. एवढा लोकांमध्ये संताप आहे, असं पाटील म्हणाले.