पुणे । बिहार निवडणुकीत भाजपाचा विजय मिळाल्यावर राज्यातील भाजप नेत्यांनाही पुन्हा एकदा सत्तेत येण्याची स्वप्न पडत आहेत. ‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वास भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. मी भविष्यकार नाही, आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सत्तेत येणार असल्याचा सूतोवाच केलं. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं. बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. मी महाराष्ट्रात काम पाहतो, मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना बिहारमध्ये गेलो होतो म्हणून नितीशकुमारांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात मी मत मांडणं योग्य नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
आताही 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निकालाचा परिणाम पश्चिम बंगालच नाही, तर यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. तुम्ही कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा 1 हजार जणांचा सर्व्हे करा, त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील, असाही विश्वास चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवला आहे. बिहारमधील जनतेने भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत देऊन विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाचे समर्थन केले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
बिहारमधील भाजपाच्या यशात फडणवीसांचा वाटा
बिहारमधील भाजपाच्या जबरदस्त यशाबद्दल आपण पक्षाचे त्या राज्याचे निवडणूक प्रभारी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा, महाराष्ट्रतर्फे विशेष अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये भाजपाने जिंकलेल्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भरघोस वाढ झाली. प्रमुख पक्षांच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटल्या असताना भाजपाचे यश अधिक उठून दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपा विजयी होण्यासाठी समर्पण भावनेने अपार मेहनत केली, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in