चंद्रकांतदादांकडून कोथरूडच्या जागेपायी कोल्हापूरचा पालापाचोळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने ‘सेना-भाजपा’ला चितपट करत जोरदार मुसंडी मारली आहे. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचा गड सांभाळण्यात सपशेल अपयश आलं आहे. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात भाजपा- सेनेला धक्का देत काँग्रेस- राष्ट्रवादीने धक्कादायक विजय मिळवला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या या विजयामुळे कोल्हापूर हा महाआघाडीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज मातब्बरांना पराभव पत्करावा लागला आहे.   

मागील विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता जिल्ह्यात शिवसेना , भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अशा एकूण दहा जागा विभागल्या गेल्या होत्या. यावेळी भाजपा-सेना यांची झालेली युती तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या महाआघाडी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील झालेल्या जागावाटपानंतर अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण आणि कागल हे दोन विधानसभा मतदारसंघ ‘हाय होल्टेज’ लढतींमध्ये होते. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. ‘ अब की बार २२० नहीं , अबकी बार २५० पार ‘ असा नारा त्यांनी कोल्हापुरात दिलेला होता. तसेच जिल्ह्यातील दहा ही जागांवर महायुती निवडून येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजपा’च्या दोन आणि शिवसेनेच्या पाच उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. याचा फायदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे कागल चे नेते हसन मुश्रीफ यांना झाला. त्यांनी आपली ताकद पणाला लावत जिल्ह्यात ‘महायुती’ला धूळ चारत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर , डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके आणि भाजपचे सुरेश हाळवणकर हे चौघेजण यावेळी हॅट्रिक करणार होते. परंतु त्यांना रोखण्यात त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना यश आले आणि हे चौघेही पराभूत झाले. यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या सह दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. परंतु मतदारांनी या मातब्बर दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला. कोल्हापूर दक्षिण मधून काँग्रेस चे ऋतुराज पाटील, कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस चे चंद्रकांत जाधव, इचलकरंजी मधून अपक्ष प्रकाश आवाडे , शिरोळ मधून अपक्ष उमेदवार राजेंद्र यड्रावकर, शाहूवाडी मधून जनसुराज्य चे विनय कोरे, कागल मधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, करवीर मधून काँग्रेस चे पी. एन पाटील , राधानगरी मधून शिवसेनेचे प्रकाश आबीटकर, चंदगड मधून राष्ट्रवादीचे राजेश पाटील, तर हातकणंगले मधून काँग्रेस चे राजूबाबा आवळे विजयी झालेले आहेत.

Leave a Comment