चंद्रकांत पाटीलांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे; रयतचा जन्म झालेल्या काले गावातील तरुणाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानावरून सर्व स्तरावर टीका करण्यात आली. आज तर त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. त्यातच आता कराड तालुक्यातील ज्या काले गावात कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या काले गावातील विकास पाटील या तरुणाने चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रयत शिक्षण संस्थेची स्थापना ४ ऑक्टोबर १९१९ साली येथील काले या गावात झाली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीरानी खऱ्या अर्थाने बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे काम केले. रयत शिक्षण संस्था उभी राहत असताना या संस्थेला मुष्टीफंडाच्या द्वारे एकेक मूठ धान्य लोक द्यायचे, आणि खऱ्या अर्थाने त्यावेळच्या मुलांना अन्नधान्य पुरवलं जायचं आणि नंतर संस्था उभी राहिली अशी माहिती विकास पाटील यांनी दिली. त्यावेळचा अहवाल आपण बघितला तर लोकांनी त्यावेळी १ पै, २ पै, ३ पै अशी रक्कम दिली होती. भीक नव्हती दिली . त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीरांनी भीक मागितली अशाप्रकारचे जे विधान केलं त्याचा निषेध करत चंद्रकांत पाटलांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी विकास पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-

पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त विधान केले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली. त्याकाळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा शाळा उभ्या केल्या. मात्र, लोक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर विसंबून राहतात. त्याकाळात लोक दहा रुपये देणारे होते. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले होते .

चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानानंतर आज अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मोरया गोसावी महोत्सवासाठी आज चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी ते आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं. प्रकारामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.