मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी येत्या १५ जानेवारीला निवड प्रक्रिया होणार आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदी निवड होईल असे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात बहुमत मिळून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. पक्षाची सत्ता असताना भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची रांग लागली होती. मात्र आता विरोधी बाकावर असताना अनेक इच्छुकांनी युटर्न घेतला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते इच्छुक होते. भाजपची सत्ता आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदी आपली वर्णी लागण्यासाठी जोरदार लाॅबिंगजी सदर नेत्यांनी लावली होती. मात्र आता या सर्वांनी युटर्न घेतल्याने पाटील हेच पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होतील असे बोलले जात आहे.