हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केल्यनानंतर भाजपने सडकून टीका केली आहे. संभाजी ब्रिगेड सोबत युती म्हणजे उद्धव ठाकरेंचा फुसका बार आहे, भाजपला याचा काहीही परिणाम होणार नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीवरून निशाणा साधला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संभाजी ब्रिगेडने मागील निवडणुकीत विधानसभेच्या 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यावेळी त्यांना फक्त 0.06 टक्के मतं मिळाली होती. त्यांना तेव्हा 36 हजार पेक्षा जास्त मते घेता आली नव्हती. त्यामुळे संभाजी ब्रिजेड सोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसका बार सोडला आहे. आम्ही राज्यात पुन्हा काहीतरी करतोय असा आव आणण्याचा प्रयत्न आहे अशी टीका बावनकुळे यांनी केली.
खरं तर मागील अडीच वर्षात महाराष्ट्राची जी दुर्गती झाली त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंसोबत युती करायला कोणीही तयार नाही म्हणून त्यांना केवळ 0.06 टक्के मते घेणाऱ्या पक्षासोबत युती करावी लागत आहे. ज्यांचे अस्तित्व नाही, असेच पार्टनर त्यांना मिळतील. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीचा भाजपला काहीही फरक पडणार नाही असेही त्यांनी सांगितले.