सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
प्राथमिक शिक्षक सहकारी निवडणुकीत शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, बँकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील व शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, दोंदे गटाचे दीपक भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील सभासद परिवर्तन पॅनेलने 17 जागा जिंकत बँकेत परिवर्तन घडवून आणले. तर शिवाजीराव पाटील यांच्या शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सभासद विकास पॅनेलला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांना दणका देत परिवर्तन पॅनेलने सत्तांतर घडविले.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी झाली. सुरवातीला सर्वसाधारण गटाची मोजणी झाली. यामध्ये पहिला निकाल परळी गटाचा लागला. यामध्ये सभासद परिवर्तन पॅनेलने खाते ओपन केले. त्यानंतर महाबळेश्वर, नागठाणे, वाई गटाची जागा जिंकत परिवर्तनने आघाडी घेतली. पण, शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सभासद पॅनेलने कराड, जावळी व आरळे गटातील जागा जिंकत समितीची विजय घौडदौड रोखण्याचा प्रयत्न केला. आरळे, जावळीत दोन्ही पॅनेलमध्ये घासून लढत झाली. पण, संघाच्या उमेदवारांनी तेथे कमी मताने का होईना विजय मिळविला. त्यानंतर सभासद परिवर्तन पॅनेलने फलटण, वाई, खंडाळा गट जिंकला. मतमोजणी मध्यावर आल्यावर पुस्तकेंच्या संघाच्या पॅनेलने तीन तर परिवर्तन पॅनेलने सहा जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर कोरेगाव, गिरवी, तरडगाव, मायणी, दहिवडी, रहिमतपूर, म्हसवडची मोजणी सुरू झाली. यामध्ये गिरवी, तरडगाव गटात परिवर्तन पॅनेलचे उमेदवार केवळ पाच मतांनी विजयी झाले. त्यामुळे संघाच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरवातीला नकार दिला. पण, जास्तच आग्रह होऊ लागल्याने फेरमतमोजणी घेण्यात आली. त्यामध्येही उमेदवारांना पडलेल्या मतांमध्ये कोणताही बदल झाला नाही.
म्हसवडचा परिवर्तनचा उमेदवार दोन मतांनी विजयी झाला. तर रहिमतपूर गटातही चुरशीची लढत झाल्याने येथे परिवर्तन पॅनेलचा उमेदवार सुरेश पवार चार मतांनी विजयी झाले. सर्वांत शेवटी राखीव जागांची मतमोजणी झाली. यामध्येही पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने सभासद परिवर्तन पॅनेलचे उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले. पुस्तकेंच्या संघाला कराड, आरळे, मेढा (जावळी) व मायणी या गटांत यश मिळाले. तिसऱ्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांना सभासदांनी नाकारले असले तरी या पॅनेलमुळे आरळे येथील सभासद परिवर्तन पॅनेलचा उमेदवार पराभूत झाला. तसेच मायणी, फलटणमधील सिद्धेश्वर पुस्तके यांच्या पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला.
विजयी उमेदवार व मते
नागठाणे : विशाल कणसे- ३९१
कराड-पाटण : महेंद्र जानुगडे – ६९६
खंडाळा : विजय ढमाळ – ३०७
परळी : तानाजी कुंभार – २१३
वाई : नितीन फरांदे – ४१३
जावळी : विजय शिर्के – ३२६ (अवघ्या 4 मतांनी विजय)
महाबळेश्वर : संजय संकपाळ – २१६
आरळे : नितीन राजे – २९३
फलटण : शशिकांत सोनवलकर – २७२
मायणी : शहाजी खाडे – २३६
कोरेगाव : नितीन शिर्के – ३३३
दहिवडी : संजीवन जगदाळे – ३०९
म्हसवड : विजय बनसोडे – २११ (केवळ 2 मतांनी विजय)
खटाव : नवनाथ जाधव – ३१२
रहिमतपूर : सुरेश पवार – २५४
गिरवी- तरडगाव- राजेंद्र बोराटे – २९९
महिला राखीव गटातून-
पुष्पलता बोबडे- ४७५१
निशा मुळीक- ४४७४
अोबीसी प्रवर्ग
किरण यादव- ५१४५ (सर्वाधिक मते)
अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग
ज्ञानबा ढापरे- ४८२०
विमुक्त जाती- भटक्या जमाती प्रवर्ग
नितीन काळे- ४८४१