सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
तासगाव तालुक्यातल्या चिंचणी येथील 18 द्राक्ष बागायतदारांची द्राक्षे उधारीवर खरेदी करून त्याची 31 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा दलालांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनीष गुप्ता, हरिशचंद्र वर्मा, शेख बागवान, शेखर मोहन, चिराग अविनाश पाटील व राजकुमार रामगोपाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या दलालांची नावे आहेत.
तर फसवणूक झालेल्यात अंकुश बाबासो बोबडे, प्रल्हाद पांडुरंग जाधव, अरुण पांडुरंग पाटील, विष्णू महादेव चव्हाण, महादेव चव्हाण, चंद्रकांत माळी, सचिन भूपाल जाधव, मनोज अनिल शिंदे, संजय रामचंद्र जाधव, पांडुरंग निवृत्ती काळे, सुरेंद्र देशमुख, लक्ष्मणशंकर पाटील, विकास विलास शिंदे, प्रतीक बाबासो काळे, उत्तम रामचंद्र पाटील, शिवाजी मंडले, प्रदीप दशरथ चव्हाण व प्रवीण तानाजी पाटील या द्राक्ष बागायतदारांचा समावेश आहे.
गेल्या आठ दिवसांत संशयितांनी या बागायतदारांची उधारीवर द्राक्षे खरेदी केली होती. त्या बागायतदारांना त्याचे पैसे देण्याबाबत टोलवाटोलवी करीत होते. बागायतदारांना हे दलाल आपली फसवणूक करत असल्याचा संशय आला. त्यामुळे दलाल राहत असलेल्या लॉजवर शेतकऱ्यांनी धडक मारली होती. त्यावेळी हे दलाल पळून जाण्याच्या तयारी होते. काहीजण पळाले होते. शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडले होते. त्यानंतर त्या दलालांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अखेर शनिवारी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.