औरंगाबाद – कोरोना महामारी विरुद्ध प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये बंद असलेली दुकाने उघडावीत यासाठी कामगार उपायुक्तांच्या सोबत हुज्जत घालणे, महिला पोलिस कॉन्स्टेबल धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 26 दुकानदार विरुद्ध दाखल गुन्ह्याचे 313 पानांचे दोषारोपपत्र तपास अधिकारी तथा क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी न्यायालयात दाखल केले आहेत.
लोक डाऊन काळात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांची 56 दुकाने मे महिन्यात प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आली होती. या दुकानांचे सील काढावे याकरिता खासदारांनी शहरातील 24 दुकानदारांना घेऊन 1 जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांनी दुकानाचे सील काढावे यासाठी उद्धटपणे बोलून पोळ यांच्यावर दबाव टाकला होता. ‘तू जिल्हाधिकार्यांची हुजरेगिरी करतोस’ असे अपमानास्पद उद्गार ही काढले होते. तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत येथून उठणार नाही आणि दुकानाचे सील काढत नाही तोपर्यंत तुला येऊ देणार नाही. अशी दमदाटी खासदार यांनी केली होती. यासंदर्भात उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी 2 जून रोजी रात्री उशिरा क्रांती चौक पोलिस ठाण्यात जलील यांच्यासह इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. तसेच कामगार उपायुक्त सोबत आरेरावी एकेरी भाषा वापरणाऱ्या खासदार जलील यांची एक महिला पोलिस कॉन्स्टेबल मोबाईल वर शूटिंग करत होती. ही बाब जलील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी महिला पोलिस कॉन्स्टेबलची हातावर हात मारून मोबाईल खाली पडला त्यांना बोट दाखवून रागाने ‘मॅडम येथे इंटरटेनमेंट साठी आलो नाही, जमत नसेल तर बाहेर उभे रहा’ असे म्हणून त्यांच्याही सरकारी कामात अडथळा आणला होता.
खासदार जलील यांच्यासह व्यापारी 26 जणांविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, गैर कायद्याची मंडळी जमा होणे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे आदींबाबत कलम 353, 332, 143, 147, 149, 188, 269 आणि 270 यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 135 नुसार 313 पानांचे दोषारोपपत्र तीस प्रतींमध्ये न्यायालयात दाखल केले आहे.