हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेल्वे विभागात (Railway Department) सरकारी नोकरी मिळावी असे स्वप्न अनेकजण पाहतात. परंतु याच स्वप्नापायी वरळीतील एकूण पाच जणांची मोठी फसवणूक झाली आहे. “आम्ही तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देऊ” असे आमिष दाखवून बिहारमधील तीन जणांनी एका वकिलासह पाच जणांची सुमारे 34 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आता सांताक्रूझ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद दानिश जिशान आलम, राहुल सिंग आणि कैलास राजपाल बाबूलाल सिंग अशी या तीन आरोपींची नावे आहे.
प्रशिक्षणासाठी कोलकत्ताला पाठवले..
सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवणारे तक्रारदार वकील पदावर काम करतात. त्यांच्या एका पोलीस मित्रानेच त्यांची ओळख या तीन आरोपींची करून दिली होती. या तिन्ही आरोपींनी या वकिलाला आमिष दाखवले की, आम्ही तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देऊ. तसेच आमची ओळख काही रेल्वे अधिकाऱ्यांसह आहे, असे देखील सांगितले. याच आमिषाला बळी पडून या वकिलाने तब्बल 10 लाख रुपये या तिघांना दिले. यानंतर या वकिलाला प्रशिक्षणासाठी कोलकत्ताला पाठवण्यात आले.
34 लाख रुपयांची फसवणूक
कोलकाता येथे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर या वकिलाला खोपोली रेल्वे स्थानकात शिपाईपदासाठी नियुक्तीपत्र देण्यात आले. परंतु हे नियुक्तीपत्र बोगस असल्याचे त्याच्यासमोर उघडकीस झाले. प्रशिक्षणामुळे या वकिलाची काही तरुणांशी देखील ओळख झाली ज्यांची या आरोपींनी फसवणूक केली होती. यातूनच ही बाब समोर आली की, या पाच जणांकडून आरोपींनी तब्बल 34 लाख रुपये घेतले आहेत. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणूक करण्यात आलेल्या वकिलाने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावरच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.