सातारा : आता गावोगावी पूर्वीप्रमाणे मिळणारे सातबाराचे हस्तलिखित उतारे मिळणे हद्दपार झाले आहे. आता सातबारा उतारा हा डिजिटल स्वरूपात मिळतो. पण या नव्या डिजिटल प्रणाली मध्ये मिळालेल्या सातबाराच्या उताऱ्यात झालेल्या चुकांमुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. शासनाने सर्व सातबारे व खाते उतारा यांसह फेरफार असेही ऑनलाईन पद्धतीने बदल केले आहेत.
दरम्यान या चुका दुरुस्त करण्यासाठी मागील सरकारने तहसीलदारांना सूचना केल्या होत्या. विशेष म्हणजे त्यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नसल्याचे सांगितले होते. मात्र त्याकडे आता सातारा जिल्ह्यात दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
आजही शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सातबारा मध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल चुका आहेत.
या चुका दुरुस्त करण्यासाठी तालुकास्तरावर किंवा मंडल अधिकारी पातळीवर यंत्रणा सुरू करणे गरजेचे आहे.
सध्या ग्रामीण भागात सोसायटीचे कर्ज परतफेड करून नव्याने पीक कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे यावेळी नव्यानं सातबारा मागितला जातो.
डिजिटल सातबारा तून झालेल्या चुकांमुळे मात्र पीक घेण्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांना तलाठी मंडळ अधिकारी तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.
या त्रुटींवर वेळीच लक्ष घालून तातडीने यात लक्ष घातले जावे अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.
डिजिटल सातबाऱ्यावर अशा प्रकारच्या चुका
काही ठिकाणी नावावरील क्षेत्र कमी दाखवले गेले आहे. तर काही ठिकाणी आणेवारी चुकीच्या पद्धतीची आहे. तर काही ठिकाणी नावेच गायब झालेली आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सोसायटीचे कर्ज घेताना बसतोय. डिजिटल स्वरूपातील सातबाराच्या असलेल्या त्रुटीमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येऊ लागल्यात.
शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामात सह ऊस आणि आले पिकासाठी केलेले आर्थिक नियोजन कोलमडून यावर त्याचा परिणाम होणार आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page