हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे थेट युतीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असून मंत्री छगन भुजबळ यांनी जलील यांच्या ऑफर नंतर त्यांनाच टोला लगावला आहे. जलील यांनी एमआयएम चा राजीनामा द्यावा, आणि मग आम्हीच त्यांना राष्ट्रवादीत घेऊ असे भुजबळ म्हणाले.
एमआयएम’चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन यावे. ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आल्यास पक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे काम करावे. तसे झाल्यास आमचे सर्वोच्च नेते शरद पवार हे इम्तियाज यांना राष्ट्रवादीत नक्कीच घेतील,’ असे म्हणत छगन भुजबळ यांनी जलील यांना टोला लगावला.
जलील यांची ऑफर नेमकी काय??
उत्तर प्रदेशात ‘एमआयएम’मुळे भाजप जिंकली, असा आरोप राजकीय वर्तुळात होत आहे. तो भविष्यात होऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव देत असल्याचे इम्तियाज यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितल्याची चर्चा आहे. ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा ही कार कशी भन्नाट चालेल,’ असेही त्यांनी सुचवल्याचे कळते.