Chhagan Bhujbal : OBC समाजासाठी छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा राजीनामा?? शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

Chhagan Bhujbal Resign
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गेल्या नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, परंतु तो अद्याप स्वीकारला गेला नाही अशी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा सुद्धा दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापण्यात आलं आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही अशीही माहिती समोर येत आहे.

१६ नोव्हेंबर २०२३ रोजी राजीनामा- Chhagan Bhujbal

वृत्त टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, यासाठी मी कोणत्याही थराला जाईन असे भुजबळांनी म्हंटल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात मला कोणतीही अडचण नाही, मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजावी लागू नये असे स्पष्ट मत भुजबळांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं कि, छगन भुजबळ यांनी मागील वर्षी म्हणजेच १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालन्यातील अंबड येथे ओबीसींच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करण्याच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता, मात्र अजूनही शिंदेनी तो स्वीकारला नाही.

दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याच एका निकटवर्तीयाने सांगितले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरंगे यांना शांत करण्यासाठी राज्य सरकारने ज्या प्रकारे सर्वतोपरी प्रयत्न केले त्यामुळे छगन भुजबळ अस्वस्थ झाले आहेत”. सरकारने जरांगे पाटलांना जास्तीचे महत्व दिल्याने ओबीसींच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा सुद्धा साधला होता. एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक असताना दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्या टीकेमुळं पेच निर्माण होतोय असं एकनाथ शिंदे याना वाटल्यास ते भुजबळांचा राजीनामा स्वीकारू शकतात.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत आपण छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करु असं म्हटलं होतं, मात्र त्यांच्यापैकी कोणीही भुजबळांशी अद्याप बोललेले नाही अशीही माहिती समोर येत आहे.