मराठा तरुणांनो आत्महत्या करू नका ; छत्रपती संभाजी राजेंच आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा तरुणांणी आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केलं आहे. तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? अशी विचारणाही केली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.

संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “विवेक रहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली”.

“माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत,” असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.

मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

बीडमधील केतूरा गावातील १८ वर्षीय विवेक रहाडे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like