हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. महाराजांच्या स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यापासून ४० मैल अंतरावर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव हे शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुरुवातीला अवघ्या काही मावळ्यांच्या साथ होती. कमी मनुष्यबळातही बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांनी गनिमी कावा या युद्धनितीचा वापर केला. हळूहळू आपले आरमार वाढवले. सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले.
शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.
हिंदू असूनही शिवाजी महाराजांनी मुस्लिमांशी कधीही दुजाभाव केला नाही. आपली लढाई मुस्लिमांच्या धर्माशी नसून, त्यांच्या साम्राज्याशी आहे, असे शिवाजी महाराज नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सांगत. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्यांना व त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती. महिलांना त्रास देणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी कडक शासन केल्याची अनेक उदाहरणे देता येतील. शिवाजी महाराजांच्या दरबारात सुनावणीसाठी आलेले प्रकरण तातडीने, समोरासमोर तडीस नेले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना हॅलो महाराष्ट्र कडून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’