छत्रपती शिवरायांची वाघनखं मातृभूमीत परतणार; ब्रिटनसोबत सरकारचा करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला ती वाघनख सध्या ब्रिटनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. परंतु आता ही वाघनखं पुन्हा एकदा मायभूमीत परतणार आहेत. ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्यासाठी राज्य सरकार ब्रिटनच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच एक करार करणार आहे. हा करार मंजूर झाला की शिवरायांचे वाघनख भारतात आणली जातील. मुख्य म्हणजे, असा करार करण्यासाठी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी तयारी दाखवली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. आता लवकरच ही वाघनखं परत करण्याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनला जाणार आहेत. हा करार पूर्ण झाल्यानंतर शिवरायांची वाघनखं वर्षभराअखेरीस भारतात परत येतील. भारतात आल्यानंतर या वाघनखांचे दर्शन सर्वांना घेता येईल. या करारा बाबतची माहिती देताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला एक पत्र आले आहे की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत देण्यास तयार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफजलखानाचा वध केला त्या दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला ही वाघनखे परत मिळू शकतील. इतर काही तारखांचाही विचार केला जात असून वाघनखं परत नेण्याच्या पद्धतही ठरवण्यात येत आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे मिळवण्याच्या करारासाठी मुनगंटीवार आणि या खात्याचे मुख्य सचिव त्याचबरोबर, राज्याच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे लंडनमधील व्ही अँड ए आणि इतर संग्रहालयांना भेट देणार आहेत. येत्या 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर रोजी तीन सदस्यीयांची टीम लंडनला जाईल. या सहा दिवसाच्या दौऱ्यासाठी सरकारचा तब्बल 50 लाखांचा खर्च होईल. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे इतिहासातील सर्वात मोठा अनमोल ठेवा आहे. आणि हा अनमोल ठेवा भारतात असावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. ज्या दिवशी ही वाघनखे पुन्हा भारतात आणली जाईल तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी असेल. सध्या हीच वाघनखे भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.