हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्यापासून राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच, “मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने जी समिती नेमली होती, त्या समितीकडून पहिला अहवाल सादर करण्यात आला आहे. शिंदे कमिटीत 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी झाली, त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनाच दाखले देणार आहोत.” अशी माहिती एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. “31 ऑक्टोंबरपासून राज्यातील 11 हजार 530 नोंदी झालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे आता राज्यात सुरू असलेले मराठा आंदोलन पेटेल की आणखीन शांत होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आज मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, “आजच्या बैठकीमध्ये अतिशय तपशीलवार चर्चा झाली. त्यामध्ये शिंदे समिती गठीत केली होती. जुन्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी शोधण्यासाठी त्या समीतीने प्रथम अहवाल सादर केलेला आहे. तो उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याची पुढची प्रक्रिया करणार आहोत. शिंदे समितीमध्ये जवळपास एक कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी झाली. 11 हजार 530 कुणबी जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांनाच आम्ही प्रमाणपत्र देऊ” अशी माहिती दिली.