लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागलीय; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठाणे येथील एका कार्यक्रम प्रसंगी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. “हल्लीच्या काळात राजकारण केले जात आहे. मात्र आजच्या राजकारणात नवी कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला आहे.

ठाणे येथे आज महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना टोलाही लगावला. यावेळी ते म्हणाले की, अशा प्रकारचे रक्तदान शिबीर घेण्याची विरोधकांच्यात हिंमत आहे का? तुम्ही आवाहन केलं तर रक्तदानासाठी अशी गर्दी उसळेल का? आम्ही बघत नाही हे रक्त कुणाला जाते. कर्तव्य म्हणून शिवसैनिक मोठे काम करत आहेत.

 

ठाणेकरांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि मी काहीही झाले तरी आई जगदंबेच्या आणि ठाणेकरांच्या दर्शनाला नक्की येणार आहे. ही आपली परंपरा आहे. हिंदुत्वाची परंपरा आहे. हिंदुत्वाची परंपरा राखत असताना आपण नवरात्रीत दुर्गामातेची पूजा करतो. आपण ज्या मातेची पूजा करतो ती एक मोठी शक्ती आहे. महिषासूर, नरकासूरासह जेवढे जेवढे असूर आले त्यांचा या जगदंबने, आदिमायेने त्या त्या युगात संहार केला. तिच्या हातात शस्त्र आहे. आमचं हिंदुत्व असं आहे. अन्याय होतो तो चिरडून टाकणं आणि गोरगरीबांचं रक्षण करणं हेच आमचं हिंदुत्व आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले.

You might also like