मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल ही अफवा.., मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यात, राज्य सरकार दिलेल्या मुदतीच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल, अशी आशा मराठा बांधवांनी बाळगली आहे. या पार्श्वभूमीवरच, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना, ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यात येईल या अफवेमुळे भुजबळ यांचा संभ्रम निर्माण झाला होता. पण, तो आता दूर करण्यात आला आहे” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. यानंतर त्यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतरच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी माझी भेट घेतली. छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या मनामधील शंका मी दूर केली आहे”

त्याचबरोबर, “शासनाने जो जीआर काढला होता, त्याच्या मेरिटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जातात. कुणबी प्रमाणपत्र व्हेरिफाय झाल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेल ही अफवा ओबीसी नेत्यांमध्ये होती. त्यामुळे छगन भुजबळ आणि इतरी ओबीसी नेते मला भेटले. त्यानंतर त्यांच्या मनातील शंका दूर करण्यात आलीये” अशी माहिती शिंदे यांनी दिली.

पुढे बोलताना, “कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने संभ्रम मनात बाळगू नये. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे करावं लागेल तर सर्व आम्ही करु. मंत्रिमंडळ बैठकीत भुजबळ यांच्या शंका दूर करण्यात आल्या आहेत” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, काल मंत्री मंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी, “मराठा समाजाला आरक्षण द्या, पण स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना ओबीसींच्या वाट्यातील आरक्षण देऊ नका” असे एकनाथ शिंदे यांना सांगितले. यानंतर, छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाकडून करण्यात आला. तसेच, त्याचे संभ्रम दूर करण्यात आले आहे अशी माहिती शिंदे यांनी माध्यमांना दिली.