कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा थर्माकोल सुटला अन् बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | शिरवडे येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय- 14) असे बुडलेल्या मुलाचे नाव आहे. ओंकार ज्योतिर्लिंग विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता. ओंकार मित्रांसोबत पोहण्यास गेला होता.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आपल्या चार मित्रांसोबत दुपारी कृष्णा नदीवरील पुलाजवळ पोहण्यास गेला होता. थर्माकोलच्या आधारे पोहण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओंकारचा थर्माकोल सुटल्याने कृष्णा नदी पात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिळून आला नाही.

ओंकार यांचा मृतदेह कराड येथील पाणबुड्यांच्या सहाय्याने शोधण्यात आला. दीड तासानंतर बुडालेला ओंकारचा मृतदेह पाणबुड्यांनी शोधून काढला. नदीपात्रात मुलगा बुडाल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली. यावेळी नागरिकांनी कृष्णा पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. घटनेची नोंद तळबीड पोलीस स्टेशन येथे झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार काळे करत आहेत.