कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचे परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ न पाहता करियर म्हणून पहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
तंत्रशिक्षण पुणे विभागीय क्रीडा स्पर्धांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय क्रीडांगण, कराड येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाची सहसंचालक दत्तात्रेय जाधव यांच्यासह शासकीय तंत्र महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
खेळामुळे मानसिक, बौद्धिक, शारीरिक वाढ होण्यास मदत होते असे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोविड मुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज तंत्रशिक्षण विभागाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. देशातील तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कौशल्य शिक्षण देत आहे. यातून नवनवीन संशोधक निर्माण होत आहेत. याचा लाभ देशाच्या आर्थिक सुधारणेला होत आहे. खेळाडू सतत सराव करीत असतात, त्यामुळे त्यांना 10 वी व 12 वी मध्ये ग्रेस गुण दिली जातात. कुस्तीचा सराव करणारे मल्ल व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच मल्लांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ ही देण्यात येणार आहे.
तंत्रशिक्षण विभाग चांगले संशोधक निर्माण करत आहे. या विभागातील अडचणी बाबत लवकरच चर्चा करून सोडवल्या जातील. तंत्रशिक्षण विभागाच्या आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पाडा असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री पाटील यांनी शेवटी सांगितले. यावेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या प्राचार्यांचा सत्कारही करण्यात आला